Friday, November 2, 2018

गिरणीवाला

गिरणीवाला

मंदार कुलकर्णी
30 ऑक्टोबर 2018

परवाच कोणाच्या तरी बोलण्यात "त्याला गव्हावर गहू घालायला सांग" असे वाक्य आले आणि मला माझ्या लहानपणीच्या आईच्या याच वाक्याची प्रकर्षाने आठवण झाली. शाळेत असताना आई जेव्हा मला दळण घेऊन पिटाळायची, तेव्हा हा ठरलेला डायलॉग असायचा. अनेक वर्षे त्याचा खरा अर्थ आणि कारण मला कळाले नव्हते. आईने बऱ्याच वेळेस पीठ सरसरीत सांगितलेले असायचे, तर मी बारीक सांगायचो, गव्हावर गहू सांगूनही पोळी लाटून झाल्यावर मी काहीतरी सांगताना गडबड केली आहे हे लक्षात यायचे आणि माझा कान पकडला जायचा.

तर असा हा कायम मला आधी कोड्यात आणि नंतर अडचणीत टाकणारा गिरणीवाला. नेहमी त्याच्या या देवळातच सापडणारा. आणि नुसता दिसणार नाही तर त्याच्या नेहमीच्या वेशात, अंगावर खंडीभर पीठ लेवून. गिरणीवाला समजा कधी बाजारात भेटला किंवा बसमध्ये दिसला तर ओळखणे अशक्य. त्या हिऱ्याला त्या गिरणीचे कोंदणच असायला हवे, तरच त्याची ओळख पटणार आणि त्याच्याकडे लक्ष जाणार. 

आजही पिठाच्या गिरणीचे रूप अनेक वर्षात बदललेले नाही. भरपूर उजेड आणि वारा नसलेली एक खोली, त्यात पुढच्या बाजूला मोठ्या आडव्या फळीवर अनेक जणांचे पिठाचे डबे दळण होण्याची वाट पाहत. एका बाजूला गिरणीचे मशीन आणि एक लांब लचक पट्टा मोटरला जोडलेला. तो कायम फटाक फटाक असा आवाज करणार आणि आपले व गिरणीच्या जिवंतपणाचे लक्षण दाखवणार. एकीकडे असंख्य डबे पडलेले, तर दुसरीकडे काही धान्याची पोती पडलेली, भर दुपार असली तरी ट्युब लाईट मिणमिणत्या दिव्यासारखी आणि या सर्व गोष्टींवर पडलेले प्रचंड पीठ. अशा पिठोरी वातावरणात असंख्य तास गिरणीवाले कसे काढतात हे मोठे आश्चर्य आहे. त्यांनी दिलेल्या नोटेला आणि नाण्यांना सुद्धा पिठाचा थर असतो, गिरणीत फरशीवर तर पीठ असते शिवाय देवाची तसबीर, विजेचे मीटर, विजेच्या तारा, खिडकी, खिडकीचे गज सगळी कडे फक्त पीठच असते.

गिरणीवाले सकाळी आंघोळ करतात का हा मला कायम पडलेला प्रश्न आहे !! रात्री गिरणी बंद झाल्यावर घरी गेल्यावर त्यांना आंघोळ करावीच लागत असेल ना... गिरणीवाल्यांना सर्वात जास्त काम कधी असेल तर आठवड्याच्या लाईट जाण्याच्या आदल्या दिवशी. घरोघरी उद्या लाईट जाणार ना मग आज गहू - ज्वारी कोठीतून निवडायला घेतात! या दिवशी म्हणजे गिरणावाले काकांना उसंत नसते.  सगळ्यांना पुढच्या 10 मिनिटात दळण करून हवे असते. मला नेहमी वाटायचे, लाईट जायच्या दिवशी यांना जरा आराम असेल, गिरणी बंद असेलअसेल, तर नाही. गिरणीची जाती काढून दिवसभर त्यावर ठोक ठोक करत नवीन डिझाईन करत बसतात. ही मंडळी विश्रांती कधी घेतात हे मोठं कोडंच आहे.

गिरणावाले मंडळींचं अजून एक विशेष म्हणजे पिठाचा डब्बा/पिशवी आणि त्याचा मालक / मालकीण हे कसे लक्षात ठेवतात हे एक मोठ्ठं आश्चर्य आहे. कोणीही कधीही दळण टाकले तरी ज्याचे दळण त्यालाच आठवणीने देणे सोपे नाही. सगळे डबे आणि सगळ्या पिशव्या मला तर सारख्याच दिसतात, ते कसे काय लक्षात ठेवतात, कमाल आहे. यांना दळणाचे वजनही सांगावे लागत नाही. नुसती पिशवी उचलून किंवा डब्यातील धान्य पाहून किती किलो आहे याचा क्षणार्धात हिशोब करून उरलेले पैसे ते परत देतात. कोणी थोडे जास्त वजनाचे धान्य दळून घेतले तरी फारशी खळखळ करत नाहीत. अगदीच जर फार शंका आली आणि गिऱ्हाईकाने आग्रह केला तरच वजन काट्यावर वजन करून दाखवतात.

यांचे अजून एक वैशिष्ठय म्हणजे यांना कामाचा कधी कंटाळा नाही. १०० डबे पेंडिंग आहेत आणि हे नुसते निवांत बसून आहेत असं सहसा दिसत नाही. आपले सरकारी अधिकारी यांच्या अगदी उलट. कधीही जागेवर सापडत नाहीत. लगेच काम होण्याची अपेक्षा ठेवणेच चुकीचे. 
असो. 

लाईट गेले तर मात्र गिरणावाले मंडळींचा नाईलाज असतो. कधी एकदा लाईट येतील आणि कामे हातावेगली करता येतील असा त्यांचा प्रयत्न असतो. एकंदरीतच कष्टकरी समाजाचे प्रतिनिधित्व ते चांगले करतात. मी सहसा त्यांना गिरणी चालू असतानाच काय पण बंद असतानाही कुणाशी फालतू बडबड करताना पाहिलेले नाहीये. आपले काम बरे आणि आपण बरे असा सर्व साधारण स्वभाव जाणवतो. कुणाच्या अध्यात न मध्यात असणारे हे चुकूनही एकाचे दळण दुसऱ्याला देत नाहीत. इथे धोबी सुद्धा एकाचे कपडे दुसऱ्याला, किंवा कपडे हरवणे वगैरे प्रकार करतात. 

गिरणीवाले गिरणीतून येणारे दळण त्यांच्या एक डब्यात आधी काढतात आणि नंतर गिऱ्हाईकांच्या पिशवीत अजिबात न सांडवता भरतात त्याचेही मला कायम आश्चर्य वाटत आले आहे. किंवा एक दळण संपता संपता दुसरे टाकायचे आणि त्याच धान्याचे पीठ नवीन डब्यात सुरू करायला ते कसबच हवे. 

गिरणीवाले रोज सांडणाऱ्या पिठाचे काय करतात हे मला न सुटलेलं कोडं आहे. लाजेकाजेस्तव मीही कधी हा प्रश्न त्यांना विचारायचा प्रयत्न केला नाही. कदाचित कोणा गरिबाला देत असावेत. 

आता गव्हाची वेगळी गिरणी, ज्वारीची वेगळी गिरणी, डाळींची वेगळी गिरणी बऱ्याच ठिकाणी दिसतात पण एकूणच गिरणावाले मंडळींचा नावीन्यावर भर नसतोच. भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनही जात्याचे काम त्यांना हातानेच करावे लागते. सोसायटीत लाईट गेल्यावर क्षणार्धात आपल्याला लिफ्ट आणि घरातील लाईट चालू हवा. त्यासाठी इन्व्हर्टर आणि जनेरेटर ची सोय असते. पिठाच्या गिरणीत अशा सोई अजून तरी आलेल्या नाहीत. उडणारे पीठ हा जरी गिरणीचा अविभाज्य भाग असला तरी ते कमीतकमी कसे उडेल किंवा झिरो कसे उडेल यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. आता आता एक्झॉस्ट दिसायला लागले आहेत पण तेही किती उपयुक्त आहेत हे प्रश्नच आहे. उडणारे पीठ शरीरात श्वासावाटे गेल्याने काय होऊ शकते याचा विचार करायची ही आपल्याला गरज वाटत नाही. जात्याचे काम केल्यावर पिठात येणारी कचकच, यावर फारसे कोणी काम करताना दिसत नाही. 

आजकाल वर्षाचं धान्य विकत घेऊन साठवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जिथे रोजचा स्वैपाकाचे पार्सल आणले जाते तिथे वर्षाचं धान्य साठवून ठेवणे आणि तर आठवड्याला किंवा 15 दिवसाला दळून आणणे हे दिवसेंदिवस कमीच झाले आहे. बऱ्याच घरात 'अग्रज चे तयार पीठ' येते त्यामुळे गिरणाचा संबंध आणि संवाद कमी कमी होत आहे. जिथे रोज पिझ्झा आणि बर्गर चे आक्रमण झाले आहे त्याला घरची पोळी, भाकरी आणि त्यासाठी लागणारी गिरणी हे म्हणजे वस्तू संग्रहालयातील गोष्टच होत जाणार आहे. 

कोपऱ्यावरची गिरणी ही आता या पुढे कोपऱ्यावरचा चांभार किंवा पानवाला सारखी अस्तंगत होईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे. या व्यवसायातील लोकांना ना ब्रँडिंग ना संघटनेचे चांगले पाठबळ. मोबाईल मध्ये रोज नवीन काहीतरी पाहायला मिळते, आपला गिरणावाला मात्र आहे तसाच राहणार. ओळखू येणार तोही पिठात माखलेला... नाही का?

1 comment:

  1. उत्तम निरीक्षण. घरी पिठाची गिरणी घेतल्याने गिरणीत जाणं बंद झालंय, अनेकांचं झालं असावं.

    ReplyDelete