Monday, October 1, 2018

पराक्रम


पराक्रम
@मंदार कुलकर्णी
14
सप्टेंबर 2018

आज एका गणेशोत्सव मंडळाची कहाणी सांगणार आहे. अभिनव शाळेकडून सावरकर पूल अर्थात पौड फाट्याकडे जाताना जो एक मार्ग (मराठीत वन वे) आहे त्या रस्त्यावर अष्टविनायक मित्र मंडळ नावाचे सार्वजनिक मंडळ आहे. काल रात्री त्या मंडळाच्या गणपती स्थापनेसाठी त्यांनी एक पथक ठरवले होते. त्या पथकाचा ट्रक भर गर्दीच्या वेळी रात्री आठ वाजता वन वे मध्ये अर्थातच विरुद्ध दिशेने घुसला. सिग्नल ला अनेक वाहने थांबली असल्याने त्याला पुढे जाता येत नव्हते. त्याचा वेग आणि आणि आवेश पाहता तो 2-4 जणांना उडवून पुढे जाण्याच्या बेतात होता. पुढे जाता येईना तेव्हा ट्रक मधील वाजवणारे कार्यकर्ते खाली उतरून लोकांना बाजूला व्हायला अत्यंत प्रेमाने आदेश देऊ लागले. अनेक वाहन चालकांनी हा एक मार्गी असल्याने त्यांना पलीकडच्या गल्लीतून (अंतर मात्र 20 मीटर) ट्रक नेण्यास सांगितले परंतु त्या कार्यकर्ते मंडळींनी विक्रम आणि वेताळ कथेतील राजा विक्रमाप्रमाणे हट्ट सोडला नाही आणि अत्यंत निग्रहाने ट्रक तसाच विरुद्ध दिशेने नेऊन त्यांच्या आवडत्या जागी उभा केला. अनेक दोन चाकी आणि चार चाकी वाहने त्या छोट्या गल्लीतून अडकून पडत असताना, कशाचीच पर्वा करताना ती खिंड गणरायाच्या साक्षीने त्यांनी पुढील 3 तास लढवली. ढोल ताश्याच्या पथकातील कार्यकर्ते इतके बेहोष होऊन त्यांचे वादन करीत होते की बास. एक गणपती सोडला तर बाकी कोणाकडे ही त्यांचे लक्ष गेले नाही.

माझी पुणे ट्राफिक पोलीसांना नम्र विनंती आहे की त्यांनी या मंडळाचा आणि या पथकाचा जाहीर सत्कार करावा आणि पुढील वर्षीपासून गावातील महत्वाचे रस्ते जसे की कर्वे रोड, लक्ष्मी रोड, शिवाजी रोड आदी ठिकाणी असाच पराक्रम करून रस्ते बंद पडायचे प्रात्यक्षिक द्यायला उद्युक्त करावे. याचा पुरेसा सराव आणि अनुभव मिळाला की पुढे जाऊन पुणे बंगलोर हायवे, पुणे मुंबई हायवे येथे त्यांना त्याची कला सादर करण्याची संधी द्यावी. थोडे दिवस हायवे बंद राहिल्याने फारसा काही फरक पडत नाही.


No comments:

Post a Comment