Sunday, April 22, 2018

पुणे - एक न होणारे सायकलींचे शहर

पुणे - एक न होणारे सायकलींचे शहर

सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे हे सायकलींचे शहर बनले ते साधारण सत्तर च्या दशकात. अनेक वर्षे पुणेकर हे बिरुद मिरवत होते. अगदी पेठेतून पेशवे पार्क, सारसबाग, पार्वती यांची सफर असो किंवा नोकरीनिमित्त आपले ऑफिस गाठणे असो. कधी पौड, भुगावकडे शेतीसाठी जाणे असो किंवा मित्रांची खडकवासला, सिंहगड सहल असो. सायकल हे एकच स्वस्त आणि हक्काचे साधन होते. चालत जाण्यात वेळ घालवण्यापेक्षा सायकलवर टांग टाकली की झाले. काही वेळात इच्छित स्थळी पोहोचता येत होते. सर्वांना सोयीचे, वेळेची बचत करणारे असे सायकल हे साधन पुण्यात लोकप्रिय न होईल तरच नवल.


हळू हळू काळानुरूप दळणवळणाची साधने बदलत गेली आणि वाहनाचे कारखाने पुण्यात आणि परिसरात आले. सायकलची जागा स्वयंचलित दुचाकी अर्थात स्कुटर आणि मोपेड यांनी घेतली. 'हमारा बजाज' आणि 'चल मेरी लुना' अशा काही लोकप्रिय जाहिरातीतील वाक्यांनी लोकांना भुरळ पडली आणि हळूहळू मंडळी या गाड्या विकत घ्यायला सुरुवात झाली. सुरुवातीला 5 ते 10 वर्षे नंबर लावून गाडी मिळायची वाट पाहायला लागायची. या काळात चार चाकी घेणे हे अजूनही श्रीमंतीचे निदर्शक होते आणि ती खूप कमी जणांकडे होती. मुळात चारचाकी की फक्त हिंदी सिनेमात पाहायला मिळायची.

हळू हळू हे सारे चित्रच बदलून गेले.गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत शहराच्या वाहतुकीमध्ये प्रचंड आणि वेगाने बदल झाले आहेत. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरात मोटारसायकलींचे प्रमाण १९८५ नंतर झपाट्याने वाढू लागल्याने सायकली कालांतराने नाह‌ीशा होत गेल्या. आज दुचाकींचे शहर अशी पुण्याची सध्या ओळख आहे. येथे गेल्या काही वर्षात आयटी आणि उत्पादन क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीही मोठ्या संख्येने निर्माण झाल्या आहेत. आयटी व कॉर्पोरेटमधील कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि कामाची अंतरे प्रचंड असल्याने दुचाकी किंवा चारचाकी हेच वाहतुकीचे साधन बनले. आज पुण्यामध्ये 38 लाख स्वयंचलित वाहने आहेत.

काळाचे चक्र हे परत मागे फिरवता येत नसते हे कटू सत्य आपण स्वीकारायला हवे. पेपर मध्ये अधून मधून "पुणे पुन्हा (पुन्हा शब्द महत्वाचा) सायकलीचे शहर व्हायला हवे" असे छापून येते. रोज कोणी ना कोणी राजकारणी याचा उल्लेख करतोच पण कोपऱ्यावरून दूध आणायचे म्हटले तर आपण पेट्रोलची गाडी बाहेर काढतो. क्षणभर गृहीत धरू की सायकल चालवायची खूप इच्छा आहे पण किती किलोमीटर? कोथरूड पासून हिंजवडी 25 किलोमीटर आहे. डेक्कन पासून मगरपट्टा 13 किमी आहे. आज एवढे अंतर सायकलवर रोज पार करायची ताकद कोणामध्ये आहे? पूर्वी पेठांपुरते सीमित असलेले पुणे आज फुरसुंगी पासुन बाणेर हिंजवडी पर्यंत पसरले आहे. त्यात पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा चालू असलेला बट्याबोळ, काही संघटित राजकारणी लोकांनी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली होऊ न देण्याचा विडाच उचलला आहे.
काही दिवसांपूर्वी सायकली संदर्भात एक सर्वक्षण करण्यात आले. झोपडपट्टी वस्तीत राहणाऱ्या नागरिकांबरोबरच लघु, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. शहरात केवळ ६ टक्के कुटुंबांकडे सायकल असल्याचे दिसून आले आहे. तब्बल ८१.३ टक्के कुटुंबांची वाहतूक दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर अवलंबून आहे. १२.४ टक्के कुटुंबांकडे सायकल किंवा इतर कोणतेही वाहन नाही, त्यामुळे या कुटुंबांची वाहतुक इतर साधनांवर विसंबून आहे. हेच जर सर्वेक्षण उच्च आणि सधन समाजातील घेतले तर असे दिसते की कोणाकडेही सायकल नाही आणि जरी विकत घ्यायची क्षमता असली तरी कोणाला सायकल चालवायचे कष्ट घ्यायचे नाहीत. ४० लाख वाहना मध्ये ४००० जरी रोज वापरल्या जाणाऱ्या सायकली क्षणभर गृहीत धरल्या तरी हे प्रमाण ०.१ टक्के इतकेच आहे. आज व्यायाम म्हणून रोडवर सायकल चालवणारे शोधून ही सापडत नाहीत.

आज पुण्यात चालू असलेल्या सायकलीचे प्रमाण नगण्य आहे. अशा परिस्थितीत सायकल साठी वेगळे रस्ते, वेगळे ट्रॅक ठेवून आपण उरलेले रस्ते आपण विनाकारण छोटे करत आहोत. आपण 21 व्या शतकात आहोत आणि स्वयंचलित वाहने वापरणे हीच आजची गरज आहेे. आधी बी आर टी ने लहान झालेले रस्ते, त्यात सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्ग. मग रस्ता उरतोच कुठे? 

दुचाकी आणि चारचाकी यांचा कमी वापर करायचा असेल तर सार्वजनिक व्यवस्था सुधारणे हाच मार्ग आहे. सायकलीचा प्रचार करणे हा मार्ग नव्हे. आज जेवढ्या रॅली निघतात त्याचा बारकाईने अभ्यास केला तर सहज लक्षात येते की सगळ्या "बाईक रॅली" असतात. का? कारण सायकल चालवायचा त्रास कोण घेणार? आज वाढलेला ऑनलाईन शॉपिंग चा व्यवसाय किंवा कामानिमित्त लांब जायचे असेल तर दुचाकी आणि चारचाकी शिवाय पर्याय नाही. आज सोळा वर्षाच्या मुलानी 10 - 10 किमी क्लासला किंवा कॉलेजला सायकलने जाणे शक्य आहे काय? आमच्या वेळेला आम्ही सायकलेनेच सगळीकडे जात होतो हे वाक्य मिरवण्यापेक्षा त्यांच्या सोयीचे वाहन मुलांना देणे यात शहाणपणा आहे.

थोडक्यात पुणे हे आता सायकलीचे शहर नसून दुचाकी आणि चारचाकीचेच शहर आहे हे सत्य आपण स्वीकारायला हवे. काळानुरूप वाढणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी यांची चांगली वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगची सोय, उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या विषयी जास्त चर्चा, उहापोह आणि विचार मंथन होणे आवश्यक आहे. पुढच्या ५० वर्षांचा विचार करून त्याप्रमाणे रस्त्यांचे नियोजन, मापे टाकायला हवीत. आज पुण्यात अनेक ठिकाणी जिथे सिग्नल हवेत तिथे चौकात एकतर राऊंड अबाऊट आहे किंवा काहीच व्यवस्था नाही. रस्त्यावरील वाहनाच्या गर्दी प्रमाणे आणि घनतेप्रमाणे याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

मंदार कुलकर्णी
९ एप्रिल २०१८

No comments:

Post a Comment