Saturday, January 7, 2017

लोणार सरोवर


3. लोणार सरोवर


लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. जगातील एक आश्चर्य असेच याचे वर्णन करता येईल.


अवकाशात अनेक आकाशगंगा, तारे, ग्रह, उपग्रह, लघुग्रह, अशनी, कणांच्या स्वरूपातील उल्का इ. वस्तू सातत्याने गतिमान असतात. कधीतरी ते एकमेकांच्या मार्गात येतात आणि त्यांची टक्कर घडून येते. त्या टकरीचा परिणाम त्या वस्तूंचं वस्तुमान, आकार, घडण, वेग व दिशा इ. बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. अवकाशात फिरणाऱ्या कणांच्या स्वरूपातील उल्का, अशनी वा तत्सम वस्तू पृथ्वीच्या जवळपास आल्यावर पृथ्वीकडे आकर्षित होतात आणि पृथ्वीच्या वातावरणात शिरेपर्यंत त्यांचा वेग सुमारे २५ ते ६० कि.मी. प्रति सेकंद एवढा प्रचंड होतो. उल्का/ अशनी लहान असल्यास प्रचंड वेगामुळे पृथ्वीच्या वातावरणाशी त्याचे घर्षण होऊन मोठी ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जेमुळे ती उल्का/ अशनी जळतो आणि आपल्याला उल्कापाताचे दृश्य दिसते. जेवढी उल्का मोठी, तेवढा जास्त वेळ हे उल्कापाताचे दृश्य आपल्याला दिसते आणि शेवटी राख पृथ्वीवर पडते. अशनी थोडा मोठा असल्यास तो पूर्ण न जळता काही प्रमाणात त्याचा न जळालेला अंश व त्याची राख पृथ्वीवर पडते. ज्या वेळी अशनीच्या न जळालेल्या भागाची पृथ्वीशी टक्कर होते, त्या वेळी त्याच्या गतिजन्य ऊर्जेचे क्षणात उष्णतेत आणि अन्य प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर होते. ही ऊर्जा काही शे टन हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या बरोबरीची असते. मुक्त होणाऱ्या या गतिजन्य ऊर्जेमुळे निर्माण होणारी उष्णता आणि अन्य ऊर्जा फारच मोठी असते. परिणामी ज्या ठिकाणी लघुग्रह आदळेल, त्या ठिकाणी मोठा खळगा- विवर (crater) पडणारच. अशा कुठल्याही अतिवेगवान मोठय़ा आकाराच्या व वस्तुमानाच्या वस्तूने आघात केल्यावर ग्रह व उपग्रहांवर पडणाऱ्या खळग्याला Impact crater (आघाती विवर) असे म्हटले जाते. लोणार सरोवर असेच तयार झाले आहे.

मुंबईपासून ५५० कि.मी., औरंगाबादपासून १६० कि.मी. आणि बुलढाण्यापासून १४० कि.मी. अंतरावर लोणार सरोवर असून ते बुलढाणा जिल्ह्य़ात येते. साधारणपणे ५०-५५ हजार वर्षांपूर्वी अंदाजे ६० मीटर लांब आणि काही दशलक्ष टन वजनाच्या लघुग्रहाने पृथ्वीला दिलेल्या टकरीत ६ ते ७ दशलक्ष टन अणुबॉम्बच्या ऊर्जेएवढी ऊर्जा निर्माण झाली. परिणामी १.८३ कि.मी. व्यासाचे आणि जवळपास १५० मीटर खोलीचे विवर तयार झाले. या विवराचे वैशिष्टय़ म्हणजे बसाल्ट खडकात (अग्निजन्य) निर्माण झालेले हे जगातील सर्वात मोठे आघाती विवर (Impact crater) होय. या विवरातील पाणी वर्षभर खारटच असते. या पाण्याचा PH पूर्वी १४ होता, आता तो ९.५ ते १०च्या जवळपास आढळतो. त्या पाण्यात जवळपास ११/१२ विविध प्रकारचे क्षार आढळतात. लोणार येथील सरोवर (विवर) हे एकेकाळी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाले असावे, असा समज होता. ‘नासा’सह जगातील बऱ्याच संशोधन संस्थांनी लोणार सरोवराचा आतापर्यंत अभ्यास केलेला आहे आणि भविष्यातही करतील, कारण हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर असून चंद्र आणि मंगळावरील विवरांचा अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी ठरते आहे.


१८२३ साली सी. जी. अलेक्झांडर या इंग्रज अधिकाऱ्याने लोणार सरोवराचा प्रथम अभ्यास केला. त्यानंतर लोणार सरोवर उपेक्षितच राहिले. १९६५ च्या दरम्यान एका वृत्तपत्रीय लेखातून लोकांना थोडीफार माहिती मिळाली. १९७२ च्या दरम्यान Smithsonian Institute, Washington DC तसेच GSI, ASI आणि आय.आय.टी. खरगपूर, नासा इ. संस्थांनी केलेल्या संशोधनाअंती लोणार सरोवर हे आघाती विवर असल्याचे सिद्ध केले आणि खऱ्या अर्थाने जगाला लोणार सरोवर परिचित झाले. तेव्हापासून आतापर्यंत असंख्य देशी-विदेशी संस्था आणि व्यक्तींनी संशोधन केलेले आहे. या सरोवराची निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपूवीर्च्या या सरोवरात मंगळावरील विषाणू सापडला असून 'बेसिलस ओडीसी' असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर. चंद्र आणि मंगळावरील विवरांचा अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी ठरते आहे.

 

सरोवरात तसेच गावाच्या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची असंख्य मंदिरे असून त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. विवरात असलेली घनदाट झाडी, मंदिरे इ.मुळे लोणार सरोवराशी आणि परिसराशी वनविभाग, GSI, ASI, लोणार नगर परिषदसारख्या शासकीय संस्थांचा संबंध येतो. विवरात सरोवराच्या काठावर कमळजादेवीचे पुरातन मंदिर असून दर वर्षी नवरात्रीत फार मोठी यात्रा भरते. दीड ते पावणेदोन लाख भाविक यात्रेनिमित्त सरोवरात उतरतात. गेल्या वर्षांपर्यंत यात्रेतील दुकाने विवरातच लावली जात होती. परंतु गेल्या वर्षांपासून वनखात्याच्या प्रयत्नाने आणि गावकऱ्यांच्या मदतीने सर्व दुकाने वर लावली जातात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण कमी होणार आहे.  

पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार हे नाव मिळाले. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे. प्राचीनात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे. सत्ययुगात लोणार सरोवर वैरज तीर्थ या नावाने ओळखले जात असे.  

इतकी माहिती वाचल्यावर आपल्याला तेथे जायची नक्की इच्छा होईल. आम्ही तेथे गेलो पण परिस्थिती काही फारशी चांगली नाही. बहुसंख्य मुस्लिम वस्ती. या जगातील आश्चयाबद्दल असणारी कमालीची उदासीनता.

या सरोवराच्या जवळपास कुठेही माहितीचा बोर्ड नाही. कुठेaही जाहिरात नाही. कडकडीत ऊन, माहितीचा अभाव आणि पर्यटकांना येण्या पासून परावृत्त करणारे वातावरण. लोणार सरोवराचे महत्त्वच न कळल्याने तेथे येणारे प्रवासी अनेक रीतीने त्याच्या ऱ्हासाला कारण ठरत आहेत. तसेच सरोवराचे जतन करायचे म्हणजे नेमके काय केले पाहिजे, तेच न कळल्याने शासनयंत्रणाही आपापल्या परीने लोणार सरोवर उद्ध्वस्त करण्यात हातभार लावत आहे.


इथे जगातले शात्रज्ञ अभ्यासासाठी येतात पण आपल्याला याची किंमत नाही. तेथे पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी पोषक वातावरण नाही. MTDC चे एक रिसॉर्ट आहे पण ते किती बुक होते या बद्दल मला शंका आहे.

 लोणार सरोवराचे जतन होणे आवश्यक आहे ते याच साठी…


-    मंदार कुलकर्णी

No comments:

Post a Comment

There was an error in this gadget