Tuesday, May 23, 2017


चि व चि सौ कां...


चि व चि सौ कां हा चित्रपट झी स्टूडियो बनवणार आणि झी टीवी मिडिया पार्टनर तेव्हा या सिनेमाची जाहिरात बाजी उत्तम होणार याची खात्रीच होती. आता प्रश्न उरतो चित्रपट कसा आहे.... तर यासाठी पुढे वाचा!

हा चित्रपट चांगला आहे. मधुगंधा कुलकर्णी यांचे लिखाण उत्तम आणि परेश मोकाशी यांचे दिग्दर्शन त्याला अगदी शोभून अगदी नवरा बायको शोभून दिसावेत तसे (म्हणजे आहेतच ते नवरा बायको !) तर सिनेमा ची कथा थोडक्यात सांगतो. सत्या आणि सावित्री यांच्या पहाण्याच्या कार्यक्रमात सावित्री काह...ी महिने मुलाकडे राहून मग लग्न करायचे की नाही हे ठरवायचे असे जाहीर करते आणि दोन्ही घरचे जेष्ठ हलतात. सत्याही त्याला पाठीम्बा देतो आणि त्यातून सुरु होते धमाल. एक छान कॉमेडी. त्यात येतात अनेक अडचणी, गमती जमती.

या सिनेमाची ताकद म्हणजे मधुगंधाने लिहिलेले संवाद, त्याचे टाइमिंग आणि डिलिवरी. सिनेमाचा वेग पकडून ठेवत संवादाची पेरणी अशी काही बेमालूम केली आहे कि बस!!! मराठीतील जावेद अख्तरच....

आता काही खटकणाऱ्या गोष्टी....
सिनेमाच्या सुरुवातीला आणि शेवटी असलेले भांडणाचे सीन अंगावर येतात. खूपच जास्त आणि अतिशयोक्ति झाली आहे. इतर वेळच्या खुसखुशीत संवादात जणू मिठाचा खड़ाच. संपूर्ण सिनेमाचा विचार करता आजीचे कैरक्टर पूर्णपणे अनावश्यक. ते काढून टाकून बाकीच्यांचे संवाद वाढवले असते तर जास्त चांगले झाले असते. 70 व्या वर्षी शेजारच्या वराशी फ़िल्मी स्टाइल खिड़कीतून उड्या मारून सूत जुळवणारी आजी कुठेच पटत नाही. सत्या आणि सावित्री यांच्यातील वैचारिक संघर्ष आणि त्यातून फुलत जाणारे प्रेम हे जास्त दाखवता आले असते.


ललित आणि मृण्मयी तसेच त्यांच्या पालक आणि मित्रांचा अभिनय छान. ललित प्रभाकर चा हा पहिलाच चित्रपट पण बाजी मारून गेला आहे. भारत गणेशपुरे थोडक्यात मजा आणतात.

नरेंद्र भिड़े यांचे संगीत छान. श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर याचे गीत श्रवणीय.

लग्नापूर्वी मुलीनी मुलाबरोबर राहणे किंवा सध्याच्या लिव इन रिलेशनशिप सारख्या आणि न पचणाऱ्या विषयाकड़े हलक्या फुलक्या पद्धतीने पहायचे असेल तर हा चित्रपट नक्की पहायला हवा.

- मंदार कुलकर्णी
22 मे 2017

Saturday, January 7, 2017

लोणार सरोवर


3. लोणार सरोवर


लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. जगातील एक आश्चर्य असेच याचे वर्णन करता येईल.


अवकाशात अनेक आकाशगंगा, तारे, ग्रह, उपग्रह, लघुग्रह, अशनी, कणांच्या स्वरूपातील उल्का इ. वस्तू सातत्याने गतिमान असतात. कधीतरी ते एकमेकांच्या मार्गात येतात आणि त्यांची टक्कर घडून येते. त्या टकरीचा परिणाम त्या वस्तूंचं वस्तुमान, आकार, घडण, वेग व दिशा इ. बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. अवकाशात फिरणाऱ्या कणांच्या स्वरूपातील उल्का, अशनी वा तत्सम वस्तू पृथ्वीच्या जवळपास आल्यावर पृथ्वीकडे आकर्षित होतात आणि पृथ्वीच्या वातावरणात शिरेपर्यंत त्यांचा वेग सुमारे २५ ते ६० कि.मी. प्रति सेकंद एवढा प्रचंड होतो. उल्का/ अशनी लहान असल्यास प्रचंड वेगामुळे पृथ्वीच्या वातावरणाशी त्याचे घर्षण होऊन मोठी ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जेमुळे ती उल्का/ अशनी जळतो आणि आपल्याला उल्कापाताचे दृश्य दिसते. जेवढी उल्का मोठी, तेवढा जास्त वेळ हे उल्कापाताचे दृश्य आपल्याला दिसते आणि शेवटी राख पृथ्वीवर पडते. अशनी थोडा मोठा असल्यास तो पूर्ण न जळता काही प्रमाणात त्याचा न जळालेला अंश व त्याची राख पृथ्वीवर पडते. ज्या वेळी अशनीच्या न जळालेल्या भागाची पृथ्वीशी टक्कर होते, त्या वेळी त्याच्या गतिजन्य ऊर्जेचे क्षणात उष्णतेत आणि अन्य प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर होते. ही ऊर्जा काही शे टन हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या बरोबरीची असते. मुक्त होणाऱ्या या गतिजन्य ऊर्जेमुळे निर्माण होणारी उष्णता आणि अन्य ऊर्जा फारच मोठी असते. परिणामी ज्या ठिकाणी लघुग्रह आदळेल, त्या ठिकाणी मोठा खळगा- विवर (crater) पडणारच. अशा कुठल्याही अतिवेगवान मोठय़ा आकाराच्या व वस्तुमानाच्या वस्तूने आघात केल्यावर ग्रह व उपग्रहांवर पडणाऱ्या खळग्याला Impact crater (आघाती विवर) असे म्हटले जाते. लोणार सरोवर असेच तयार झाले आहे.

मुंबईपासून ५५० कि.मी., औरंगाबादपासून १६० कि.मी. आणि बुलढाण्यापासून १४० कि.मी. अंतरावर लोणार सरोवर असून ते बुलढाणा जिल्ह्य़ात येते. साधारणपणे ५०-५५ हजार वर्षांपूर्वी अंदाजे ६० मीटर लांब आणि काही दशलक्ष टन वजनाच्या लघुग्रहाने पृथ्वीला दिलेल्या टकरीत ६ ते ७ दशलक्ष टन अणुबॉम्बच्या ऊर्जेएवढी ऊर्जा निर्माण झाली. परिणामी १.८३ कि.मी. व्यासाचे आणि जवळपास १५० मीटर खोलीचे विवर तयार झाले. या विवराचे वैशिष्टय़ म्हणजे बसाल्ट खडकात (अग्निजन्य) निर्माण झालेले हे जगातील सर्वात मोठे आघाती विवर (Impact crater) होय. या विवरातील पाणी वर्षभर खारटच असते. या पाण्याचा PH पूर्वी १४ होता, आता तो ९.५ ते १०च्या जवळपास आढळतो. त्या पाण्यात जवळपास ११/१२ विविध प्रकारचे क्षार आढळतात. लोणार येथील सरोवर (विवर) हे एकेकाळी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाले असावे, असा समज होता. ‘नासा’सह जगातील बऱ्याच संशोधन संस्थांनी लोणार सरोवराचा आतापर्यंत अभ्यास केलेला आहे आणि भविष्यातही करतील, कारण हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर असून चंद्र आणि मंगळावरील विवरांचा अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी ठरते आहे.


१८२३ साली सी. जी. अलेक्झांडर या इंग्रज अधिकाऱ्याने लोणार सरोवराचा प्रथम अभ्यास केला. त्यानंतर लोणार सरोवर उपेक्षितच राहिले. १९६५ च्या दरम्यान एका वृत्तपत्रीय लेखातून लोकांना थोडीफार माहिती मिळाली. १९७२ च्या दरम्यान Smithsonian Institute, Washington DC तसेच GSI, ASI आणि आय.आय.टी. खरगपूर, नासा इ. संस्थांनी केलेल्या संशोधनाअंती लोणार सरोवर हे आघाती विवर असल्याचे सिद्ध केले आणि खऱ्या अर्थाने जगाला लोणार सरोवर परिचित झाले. तेव्हापासून आतापर्यंत असंख्य देशी-विदेशी संस्था आणि व्यक्तींनी संशोधन केलेले आहे. या सरोवराची निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपूवीर्च्या या सरोवरात मंगळावरील विषाणू सापडला असून 'बेसिलस ओडीसी' असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर. चंद्र आणि मंगळावरील विवरांचा अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी ठरते आहे.

 

सरोवरात तसेच गावाच्या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची असंख्य मंदिरे असून त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. विवरात असलेली घनदाट झाडी, मंदिरे इ.मुळे लोणार सरोवराशी आणि परिसराशी वनविभाग, GSI, ASI, लोणार नगर परिषदसारख्या शासकीय संस्थांचा संबंध येतो. विवरात सरोवराच्या काठावर कमळजादेवीचे पुरातन मंदिर असून दर वर्षी नवरात्रीत फार मोठी यात्रा भरते. दीड ते पावणेदोन लाख भाविक यात्रेनिमित्त सरोवरात उतरतात. गेल्या वर्षांपर्यंत यात्रेतील दुकाने विवरातच लावली जात होती. परंतु गेल्या वर्षांपासून वनखात्याच्या प्रयत्नाने आणि गावकऱ्यांच्या मदतीने सर्व दुकाने वर लावली जातात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण कमी होणार आहे.  

पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार हे नाव मिळाले. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे. प्राचीनात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे. सत्ययुगात लोणार सरोवर वैरज तीर्थ या नावाने ओळखले जात असे.  

इतकी माहिती वाचल्यावर आपल्याला तेथे जायची नक्की इच्छा होईल. आम्ही तेथे गेलो पण परिस्थिती काही फारशी चांगली नाही. बहुसंख्य मुस्लिम वस्ती. या जगातील आश्चयाबद्दल असणारी कमालीची उदासीनता.

या सरोवराच्या जवळपास कुठेही माहितीचा बोर्ड नाही. कुठेaही जाहिरात नाही. कडकडीत ऊन, माहितीचा अभाव आणि पर्यटकांना येण्या पासून परावृत्त करणारे वातावरण. लोणार सरोवराचे महत्त्वच न कळल्याने तेथे येणारे प्रवासी अनेक रीतीने त्याच्या ऱ्हासाला कारण ठरत आहेत. तसेच सरोवराचे जतन करायचे म्हणजे नेमके काय केले पाहिजे, तेच न कळल्याने शासनयंत्रणाही आपापल्या परीने लोणार सरोवर उद्ध्वस्त करण्यात हातभार लावत आहे.


इथे जगातले शात्रज्ञ अभ्यासासाठी येतात पण आपल्याला याची किंमत नाही. तेथे पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी पोषक वातावरण नाही. MTDC चे एक रिसॉर्ट आहे पण ते किती बुक होते या बद्दल मला शंका आहे.

 लोणार सरोवराचे जतन होणे आवश्यक आहे ते याच साठी…


-    मंदार कुलकर्णी

Saturday, December 17, 2016

नेवासेनेवासे

नेवासे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. मुळात हे गाव मुख्य रस्त्यावर म्हणजे high way वर नाहीये त्यामुळे येथे येताना नेवासा फाटा येथून आत वाकडी वाट काढून यावे लागते. नगर आणि औरंगाबाद च्या मध्ये असूनही इतिहास आणि पर्यटन या बाबतीत काहीसे मागे असलेले हे गाव आहे.

प्रवरा नदी हि येथे अमृतवाहिनी समजली जाते. अगस्तीऋषींच्या तपोभूमितून उगम पावलेली प्रवरा नेवासा येथे संत श्री ज्ञानेश्वरांच्या भक्तीसंवादाचा ठेवा सामावून घेत दक्षिण गंगा गोदावरी ला जाऊन मिळते. नेवासे तालुक्यातून या शिवाय गोदावरी आणि मुळा या दोन नद्यासुद्धा वाहतात. या तीन नद्या आणि त्यावरील धणांतील पाणी यांमुळे या तालुका सुपीक बनला आहे. नेवासे तालुक्यात मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई आणि ज्ञानेश्वर साखर कारखाना हे दोन साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांच्या अनुषंगाने येथे काही शिक्षणसंस्था निघाल्या आहेत. पाण्यासाठी खर्‍या अर्थाने समृद्ध असलेल्या या गावाला राजकारणामुळे खुंटलेली प्रगती पहावी लागत आहे.

नेवासे आज प्रसिद्ध आहे ते ज्ञानेश्वरांनी येथे ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून. बहुसंख्यांना ज्ञानेश्वर म्हणजे आळंदी इतकेच माहिती असते त्यांच्या ज्ञानात थोडी भर. या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात म्हणजे 1291 साली भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो.
ॐ नमोजी आद्या |
वेद प्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या |
आत्मरुपा |
देवा तूंचि गणेशु |
सकलमति प्रकाशु |
म्हणे निवृत्ति दासु |
अवधारिजो जी |
असे सांगून जगाचा उद्धार करणार्‍या ज्ञानेश्वरांनी ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे या गावात आहे. त्याला पैस असे म्हणले जाते.


नेवासे येथे मोहिनीराजाचे 75 फुट उंच एक खूप जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत लिहिल्याप्रमाणे भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले आणि भस्मासुराचा वध केला. जिथे हा भस्मासुराचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर हेमाडपंती कलात्मकतेचा सुंदर नमुना असून, मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे. या ठिकाणी पुरातत्व खात्याने उत्खनण केले असून येथे दगडी हत्यारे सापडली आहेत. त्यात हातकुर्‍हाडी सापडल्या आहेत. 1773 साली 5 लाख रुपये खर्च करून गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी या मंदिराचा जिणोद्धार केला आहे. शहाजी भोसले यांच्या वडिलांना वेरूळ ची जहागिरी असताना शहाजी भोसले नेवासे येथे च राहत होते अशी इतिहासात नोंद आहे. त्यांनी मोहिनिराजाच्या मंदिराला अनेक देणग्या दिल्याचे उल्लेख आढळतात. त्यानंतर पेशव्यांनी वार्षिक रु 1500 देणगी देवू केली होती जी इ स 1860 पर्यन्त चालू होती.

नेवासा येथे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या मदतीने ज्ञानेश्वर पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरीचे कथन करीत असलेले एक मोठे शिल्प नुकतेच नेवासे येथे मंदिराच्या मागे बसवण्यात आले आहे. त्या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम सध्या चालू आहे. मला आशा आहे, त्या निमित्ताने का होईना हे गाव आणि हा सर्व परिसर भारताच्या नकाशावर येईल आणि आपल्या पुढील पिढ्यांना ज्ञानेश्वर महाराजांची आठवण करून देत राहील.-     - मंदार कुलकर्णी

शनि शिंगणापुर

मी या दिवाळी सुट्टी मधे काही गावे पाहिली. "मी पाहिलेली काही गावे" ही सिरिज लिहीत आहे, त्याची आज सुरुवात करीत आहे.... 


शनि शिंगणापुर

शनि शिंगणापुर हे ठिकाण नगर जिल्यात नेवासा तालुक्यात सोनाई येथे असून ‘शनिदेवाचे स्थान’ म्हणून प्रसिद्ध आहे. नगर जिल्हा तसाही खूप शांत, शेतीसाठी समृद्ध. हे ठिकाण ही त्याला अपवाद नाही. मी येथे सर्व प्रथम गेलो होतो १९८९ साली. शनि देवाचे एक छोटेसे देवस्थान इतपतच माहिती होती. तेथे एक ५ फुट उंचीचा काळा उभा दगड आहे. हाच स्वयंभू शनिदेव. पूर्वी अशी कथा सांगतात, की हा दगड एका मेंढपाळाला जमिनीत दिसला. त्याच्या काठीने त्याने टोचून पाहिला तर त्यातून रक्त येवू लागले. रात्री शनि देवाने त्याच्या स्वप्नात येवून सांगितले आणि त्याची दर शनिवारी तेल वाहून पुजा करण्यास सांगितले. गावकर्यां्नी येथे मोठे मंदिर बांधायचे ठरवले पण शनि देवांनी तसे न करता फक्त पुजा करण्यास सांगितले. त्यामुळे आजही येथे मोठे मंदिर वा छत नाही. आकाश हेच छत आणि तेल हीच पुजा. शनि देवाचा दगड / शिळा ही स्वयंभू असून त्याला बाकी काही संरक्षण नाही. तेव्हा त्या चौथर्यान पर्यन्त आरामात जाता यायचे. शनि देवाच्या शिळेला कोणी स्पर्श करू शकत नाही. हे देवस्थान भारताला माहिती पडले ते “सूर्य पुत्र शनिदेव” या गुलशन कुमार यांच्या चित्रपटामुळे. तेव्हापासून येथे भक्तांचा ओघ सुरू झाला आहे.  

या ठिकाणाचे अजून एक महत्वाची विशेषता की शनि देवाच्या कृपेने येथे चोर्याण मार्याी होत नाहीत अशी श्रद्धा आहे. येथील घरांना बंद दारे नाहीत, बंद खिडक्या नाहीत. फक्त चौकटी आहेत. येथील रहिवासी त्यांच्या वस्तू बिनधास्त घरात सोडून जातात. जगातील हे असे एकमेव गाव असेल. येथील सरकारी रेशनचे दुकान काय बँक सुद्धा तशाच. मागील काही काळात छोटे मोठे चोर्यां चे प्रकार घडले पण ते फारच किरकोळ.
२०१६ साली खर्यां अर्थाने जगासमोर हे गाव आले. २६ जानेवारीला तृप्ति देसाई यांनी महिलांना येथे प्रवेश हवा म्हणून मोठे आंदोलन केले आणि तेव्हा पासून येथील गर्दी अजूनच वाढली.

आता या गावाचे पुर्णपणे व्यावसायिक अशा देवस्थानात रूपांतर झाले आहे. प्रचंड गर्दी आवरण्यासाठी लांबच लांब रांगा लावायची सोय, प्रसादाची सोय, शनि देवाला वाहण्यासाठी तेल मिळायची सोय आणि तेही मोटरने मोठ्या पिपातून पंप करून शनि देवावर वाहिले जाईल अशी सोय. नेहेमी प्रमाणे ‘इथे फोटो काढू नका; असे फलक आहेतच. 

हळूहळू हे देवस्थान गर्दीचे नवे उच्चांक मोडेल अशी स्थिती आहे पण या सगळ्यात हे स्थान पूर्वीची शांतता, प्रसन्नता गमावून बसते आहे की काय असे वाटते आहे. 

- मंदार कुलकर्णी

Sunday, February 21, 2016

बाजीराव मस्तानी (चित्रपट)

बाजीराव मस्तानी (चित्रपट)

18 डिसेंबरला बाजीराव मस्तानी हा चित्रपट रिलीज झाला. त्याच्या आधीपासून त्याच्या बद्दल आलेल्या कहाण्या, पिंगा आणि वाट लावली अशी गाणी ऐकून तर तो पाहायची इच्छा होत नव्हती. शेवटी 2 महिन्यांनी एक रसिक म्हणून (इतिहास विषयाची आवड आणि अभ्यास बाजूला ठेवून) मी तो पाहिला आणि खरे सांगतो, डोके उठले आणि डोके दुखायला लागले.

निनाद बेडेकर सारख्या इतिहास तज्ञाचे नाव पुढे करून संजय लीला भन्साळी इतिहासाची इतकी मोडतोड करतील असे वाटले नव्हते. निनाद बेडेकर जर आज जीवंत असते तर मी तडक त्यांच्या घरी जाऊन विचारणा केली असती. मुळात संजय लीला भन्साळीना बाजीराव पेशवे समजलाच नाहीये. एखादी ऐतिहासिक कलाकृती बनवताना जी काळजी घ्यायला पाहिजे ते दिसत नाही. उदा.
1.   पेशवे हे भारतभर पसरलेल्या मराठा साम्राज्य चालवणारे मोठे प्रस्थ होते. शाहू केवळ नामधारी होते. त्यामुळे हा चित्रपट बनवताना एक साम्राज्याचे पंतप्रधान/राजे असेच दाखवणे आवश्यक होते
2.   बाजीरावाने बायकोला काशी/काशीबाई हाक मारणे
3.   केशवपन केलेल्या राधाबाई ने घरात मोकळे डोके दाखवणे
4.   बाजीराव आणि काशीबाई चा so called टब बाथ
5.   बाजीरावाच्या तोंडी असलेले वाट लावली गाणे
6.   काशीबाई आणि मस्तानी यांचे पिंगा गाणे
7.   इतिहासाप्रमाणे मस्तानी तिच्या महालात नजरबंद होती, साखळ दंडाने कधीच बंदिस्त नव्हती.
8.   आणि असंख्य ....

बाजीराव आणि मस्तानीचे लग्न झाले होते आणि ती त्याच्या बरोबर बुंदेल खंडाहून वाजत गाजत आली होती. इथे मात्र भलतेच दाखवले आहे.

एक राज घराण्यातील संघर्ष कसा दाखवावा याचेही भान या चित्रपटाने पुर्णपणे सोडले. एक प्रेमकथा दाखवताना चिमाजी आप्पा, राधाबाई  आणि नानासाहेब पेशवे यांना पार खलनायक केले आहे. राज घराण्यातील संघर्ष इतक्या उथळपणे आणि तद्दन मसाला हिन्दी चित्रपटाप्रमाणे दाखवला आहे....

पूर्वीच्या काळी ही असे चित्रपट आले. उदा. मुगले आझम पण त्याची नखाची ही सर या चित्रपटाला नाही. अनेक जण या चित्रपटाची मुगले आझमशी तुलना करतात. पण सलीम अनारकलीच्या हळुवार प्रेमाची इथे कुठेच जवळीक नाही. एक चुकीची प्रेम कहाणी दाखवताना इतिहासाची यांनी पार “वाट लावली”.

मला इथे एकच प्रश्न विचारावासा वाटतो. हाच चित्रपट जर इंग्लंडची राणी एलिझाबेद/ लेडी डायना, छत्रपती शिवाजी, मुगल सम्राट औरंगजेब किंवा आजच्या काळातील बिल क्लिंटन किंवा बराक ओबामा यांच्यावर ऐतिहासिक कलाकृती म्हणून बनवला असता आणि cinematic liberty ची ढाल घेऊन असे अर्वाच्च प्रकार घुसवले असते तर प्रेक्षकांना चालले असते का? त्यांच्या अंत:पुरातील गोष्टी अशा उथळ पणाने दाखवून चालले असते का?

Cinematic liberty घेताना किती घ्यायची याचे ही काही ताळतंत्र हवे. आज राज घराण्यातील स्त्रिया त्याही राणी पदावरील काशीबाई अशा नाचतील का? बाजीराव स्वत: असे नाचेल का? याचे साधे भान ही असू नये?

काही जण म्हणतात, इतका भव्य चित्रपट बनवला, त्याने 350 कोटी रुपये कमावले, पण त्यात भव्य काहीच दिसले नाही. केवळ संगणकावर बनवलेल्या लढाया आणि बाजीरावाने केलेले बच्चन सारखे काही स्टंट. यात कसली आली आहे भव्यता? ना हा चित्रपट बाजीरावाची यशोगाथा सांगत ना प्रेमकहाणी नीट दर्शवत. मस्तानी बाजीरावाला भेटण्यापूर्वी एक हुशार, लढाऊ राजकन्या होती. तीच नंतर अतिशय अगतिक, हताश, गळीतगात्र आणि नाच करणारी अशी का दाखवली आहे? चित्रपटात बाजीराव बहुतेक काळ आपल्या सिक्सपॅकचे प्रदर्शन करत फिरत असतो किवा काशीबाई किंवा मस्तानी बरोबर प्रेमाचे चाळे. यात राजेपण कुठेच नाही. ज्या बाजीरावाने मराठा साम्राज्य महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन दिल्ली पर्यन्त गवसणी घातली, ज्याच्या मुलाने (रघुनाथ) आजच्या अफगाणिस्थान मधील अटक येथील किल्ला सर करून मराठा साम्राज्य विस्तारले, त्या बाजीरावाला मस्तानी च्या प्रेमातील देवदास बनवला आहे. बाजीरावाचा मृत्यू अतिश्रमाने, ताप आणि उष्मा घाताने झाला आणि चित्रपटात तर भलतेच.

ह्या सिनेमाविषयी मत प्रदर्शन केवळ सिनेरसिक किंवा पेपर मधील परीक्षण करताना जाणवते की, एका मराठी साम्राज्याच्या अत्यंत यशस्वी राजाची यशोगाथा करायची सोडून मस्तानी सारख्या नाचणार्‍या मुलीच्या प्रेमात पडलेल्या वेड्याची गोष्ट अशी तद्दन फिल्मीकहाणी केली आहे. तिथेच हा चित्रपट प्रेक्षकांची शुद्ध फसवणूक करतो. उभ्या उण्यापुर्‍या 20 वर्षाच्या कारकिर्दीत एकही लढाई न हरणारा हा जगातील एकमेव राजा असताना त्याच्या विषयी असा चित्रपट काढणे हे भारतीय चित्रपट सृष्टीचे दुर्दैव आहे....

-     - मंदार कुलकर्णी
21 फेब्रु 2016


Monday, January 4, 2016

राष्ट्रपती भवन

माझ्या आर्मी मधील लेफ्ट. कर्नल या पदावर असलेल्या भावाच्या कृपेने नुकतेच राष्ट्रपती भवन पहायचा योग आला. बहुतेक सर्व पर्यटक इंडिया गेट, राजपथ इत्यादी ठिकाणे पाहतात. राष्ट्रपती भवन पहाण्यासाठी एकतर पूर्व परवानगी घ्यावी लागते आणि तीही खूप मर्यादित संख्येने लोकांना मिळते. साधारण 10 ते 30 जणांचा ग्रुप बनवतात आणि प्रत्येक ग्रुप बरोबर एक मार्गदर्शक राष्ट्रपती भवनाचा काही भाग पर्यटकांना दाखवतात. या सफरी विषयी अधिक लिहिण्यापुर्वी ‘राष्ट्रपती भवन’ आणि त्याचा जुजबी इतिहास सांगतो.
राष्ट्रपती भवन म्हणजे आपले आदरणीय राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांचे घर आणि कार्यालय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या व्यक्तीचे घर आणि कार्यालय एकच? तर हे ठिकाण 320 एकर मध्ये उभे केलेले असून त्यात 340 खोल्या आहेत. मुळात याचे पूर्वीचे नाव ‘व्हॉईसरॉय हाऊस’ असे आहे. 1910 साली इंग्रजांनी (ब्रिटिश) भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे हलवायचे ठरवले. नवीन शहराचे नियोजन करायचे काम एडविन लुतेन याने केले. जुन्या दिल्लीजवळ साधारण 4000 एकर जागा मोकळी करून तेथे नवीन शहर वसवायचे ठरले. तेच आजचे ‘नवी दिल्ली’. त्यासाठी रायसिना आणि मलचा ही खेडी पुर्णपणे विस्थापित करण्यात आली आणि जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. एडविनच्या डिजाइन चे वैशिठ्यच हे की जे करेल ते सारे भव्यदिव्य. जवळ जवळ 20 वर्षे याचे बांधकाम चालू होते. असंख्य वेळा दिल्ली आणि इंग्लंड अशा वार्‍या त्याने केल्या. 1929 साली अखेर ते पूर्ण झाले.
4 मजले, 340 खोल्या, 19000 वर्ग मिटर क्षेत्रफळ, बांधकामासाठी लागलेल्या 70 कोटी विटा आणि 85000 वर्ग मी चे दगड यावरुन भवनाच्या भव्यतेची कल्पना येईल.
राष्ट्रपती भवनामधील मुघल गार्डन आणि इतर गोष्टी ही तितक्याच प्रेक्षणीय. त्यात काही मुझियम आहेत. राष्ट्रपतीना वेगवेगळ्या देशाच्या भेटीत मिळालेल्या भेटवस्तू आहेत, अगदी काटा चमच्या पासून ते किचन सेट पर्यन्त. भवनाच्या प्रांगणात मोर मनसोक्त फिरत असतात. कडेकोट सुरक्षा आणि थोडेसे दहशतीचे वातावरण यात काही तास निघून जातात.
ही वास्तू पाहताना माझ्या मनात मात्र वेगळेच विचार घोळत होते. आज जरी ते आपल्या राष्ट्रपतीचे निवासस्थान असलं तरी एकेकाळी ते इंग्रजांच्या ‘व्हॉईसरॉयचे घर’ होते. ‘व्हॉईसरॉय ऑफ इंडिया’ असे ते पद होते. नाही म्हटले या पदावरील व्यक्ती इंग्लंडच्या राणीला सलाम करणार आणि तिने दिलेल्या पगारावर जगणार. अशा व्यक्तीचे घर आपल्या देशाच्या सर्वोच्च व्यक्तीने का घ्यावे आणि वापरावे? व्हॉईसरॉय हा शेवटी राणीचा नोकरच ना...
राष्ट्रपती भवनात आम्ही जे कक्ष पाहिले त्यात सर्व इंग्रजांच्या काळातील आठवणी जपल्या होत्या. 19 व्या शतकातील इंग्लंडचे राजे, राण्या, व्हॉईसरॉय आणि अनेक जणांची तैलचित्रे. संगमरवरचे पुतळे, त्याचा मनमरातब हेच सर्व काही. यात ‘भारतीय’ असे काहीच नव्हते. इंग्रजांचे राजे आणि राण्या यांचे कौतुक पाहायचे तर मी इंग्लंडला जाऊन पाहीन. राष्ट्रपती भवन हे त्याचे ठिकाण असू शकत नाही. उगाचच गुलामगिरीत परत गेल्यासारखे वाटले.
दुसरा मुद्दा. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आज लाखो लोक फुटपाथ वर, रस्त्यावर झोपतात तर खरेच महामाहीम राष्ट्रपती यांना 320 एकर जागेतले घर कशाला पाहिजे? गेल्या वर्षी पर्यन्त हेच राष्ट्रपती भवन हे जागेच्या क्षेत्रफळांनुसार ‘जगातील सर्वात मोठे राहण्याचे ठिकाण’ होते !!! लहान घरात राष्ट्रपती यांनी का राहू नये? व्हॉईसरॉयच्या राहण्याच्या सोयीसाठी बनवलेली वास्तू संग्रहालयात रूपांतरित करून, त्यातून स्वदेशी आणि विदेशी पर्यटक आकर्षित करून परकीय गंगाजळी मिळवायला हवी. राष्ट्रपती यांची अशी अनेक घरे आज भारतात आहेत. उदा. ‘राष्ट्रपती नीलायम’, हैदराबाद. कशासाठी? आपल्या घटनेप्रमाणे राष्ट्रपती ही सर्वोच्च व्यक्ती असली तरी त्यांचे सर्व महत्वाचे अधिकार हे पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ हे घटनेप्रमाणेच वापरतात. मग आजच्या काळात एवढा बडेजाव खरच हवा का?
एकंदरीत ही वास्तू मनापासून आनंद आणि अभिमान वाटण्यापेक्षा जास्तीचे प्रश्न निर्माण करून गेली.....

- मंदार कुलकर्णी
3 जाने 2016

Sunday, December 6, 2015

‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट


ज्या दिवशी मला समजले कि सुबोध भावे कट्यार… हा चित्रपट करणार आहे तेव्हा पासूनच मला कमालीची उत्सुकता लागली. आणि दिवाळी च्या मुहूर्तावर ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट प्रदर्शित झाला.हे काही वर्तमान पत्रातील सिने परीक्षण नाही त्यामुळे त्याची कथा आणि नाटक , त्याचा इतिहास इथे लिहिण्याची गरज नाही.
एखाद्या गरुडाला त्याच्या पंखात बळ आल्यावर जसे अख्खे आकाश विहारायला मिळते तशी अवस्था सुबोधची झाली आहे. नाटकाचे ६० फुटाचे स्टेज पासून क्षितिजा पर्यंत पोहोचणारा कॅमेरा यातील फरक त्याने दिग्दर्शक म्हणून त्याच्या पहिल्याच सिनेमात उत्तम रीतीने ओळखला. आणि तिथूनच कथेचा मूळ गाभा न बिघडवता संपूर्ण चित्रपटासाठी नवीन कथा लेखन करून घेतले. पंडित भानू शंकर शास्त्री यांचे नाटकात केवळ फोटो मध्ये असेलेले स्थान बदलून त्याने पूर्णपणे एक चांगले कॅरक्टर तयार केले . विश्रामपूर चा दरबार, ताज महाल, हवेली, देऊळ आणि अशी अनेक आवश्यक ठिकाणे चित्रपटासाठी घेऊन एक भव्य चित्रपट निर्माण केला. त्या काळातील वेशभूषा, सजावट याचा खूप बारकाईने अभ्यास केलेला जाणवतो. चित्रपटाची लांबी ४ तास होवू नये म्हणून गीते पूर्ण न घेता १ किंवा २ कडवी घेणे हा ही विचार स्तुत्यच. कट्यारीला रीमा यांचा आवाज देवून कथा पुढे नेण्याची कल्पना ही छान.
आता थोडेसे कलाकार निवडी विषयी. सर्वच कलाकारांची निवड कथा योग्य आणि यथा योग्य आहे. मृण्मयी आणि अमृताची निवड कथेसाठी उत्तम त्याचबरोबर सदाशिव स्वतः सुबोधने स्वतः करणे हे त्याच्यातील कलाकाराला आणि दिग्दर्शकाला नक्कीच अवघड गेले असेल. त्याने केलेला सदाशिव चा गायन करतानाचा अभिनय थेट महेश काळे ची आठवण करुन देतो. सर्वात कुठे बाजी मारली आहे ती सचिनने केलेल्या खांसाहेब साठी. इतके वर्ष हा रोल त्याचीच वाट पाहत होता असे वाटते. त्याचे उर्दू उच्चार, त्याची अभिनयवरील पकड आणि कुठेही खांसाहेब उथळ न होवू देण्याचे कसब अप्रतिम. सचिन खांसाहेब यांचा रोल कसा करणार या बद्दल खूप लोकांच्या मनात शंका होत्या. किंबहुना "महागुरु" नावाखाली त्याची what’s app वर भरपूर चेष्टाही झाली. पण त्याच्या शिवाय हा रोल आजच्या काळात कोणी करूच शकणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. त्या रोलमध्ये त्यांनी भरलेले गहिरे रंग, त्याच्या वेगवेगळ्या छटा, सर्वच लाजवाब.
पंडित भानू शंकर शास्त्री यांच्या बाबतीत मात्र जरा गडबड झाली आहे. शंकर महादेवन याने गाण्याची आणि संगीताची बाजू उत्तम सांभाळली असली तरी पंडित भानू शंकर शास्त्री यांचे शब्दोच्चार…. मज़ा नहीं आया। एका अ मराठी गायकाला पंडित भानू शंकर शास्त्री यांचा रोल सुबोधने देणे हे फार आश्चर्य कारक आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात निदान डबिंग तरी चांगल्या मराठी माणसाकडून करून घ्यायला हवे होते. हे म्हणजे “अख्खा शर्ट कडक इस्त्री केलेला आणि खिशावर मात्र चुण्या ….”
संगीत म्हणजे या चित्रपटाचा प्राण. राहूल, महेश आणि शंकर यांनी त्यांच्या कसलेल्या आवाजाने गीते उच्च स्थानावर नेवून ठेवली आहेत.
एकंदरीतच "संपूर्ण जमून आलेली बिर्याणी" असे याचे वर्णन करता येईल. माझे परीक्षण वाचून कोणी हा चित्रपट पहावा अशी माझी मुळीच अपेक्षा नाही पण जर जाणारच असाल तर संपूर्ण मोकळ्या डोक्याने जा. वसंतराव देशपांडे, राहुल देशपांडे आणि चारुदत्त आफळे यांचे खांसाहेब अजरामर आहेतच; पं जितेंद्र अभिषेकी यांचा सुरेल स्वर आणि संगीत विसरणे शक्य नाहीच पण चित्रपटाचा मोठा कॅनवास मिळाल्यावर त्याचे कसे झगझगीत सोने होते हे पाहण्यासाठी हा चित्रपट एकदा पहायलाच हवा....

- मंदार कुलकर्णी
२२ नोव्हेंबर २०१५

 
There was an error in this gadget